पिंपरी-चिंचवड(पुणे) - कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात प्रशासनाच्या परवानगीने लोकनाट्य म्हणजेच तमाशा सुरू झाला (Tamasha Started in Pune) आहे. त्याला नागरिक आणि रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे लोकनाट्य कलाकार भारावून गेले आहेत. पुन्हा मायबाप सरकारने बंधनं आणून तमाशावर गदा आणू नये, अशी मागणी तमाशा कलावंतांनी केली. कोरोनाकाळात धुनी, भांडी करून आम्ही आमचं पोट भरलं आहे. त्यामुळे आता देवाने जी कला दिली आहे ती सादर करून पोट भरू द्या, अशी हाथ जोडून विनंती कलावंतांनी राज्य सरकारला केली आहे.
- तमाशा काळानुसार बदलला -
दरम्यान, लोकनाट्य (तमाशा) काळानुसार बदलत असून नृत्य सादर करण्याची पद्धत आणि गाणी बदलत चालली आहेत. आज पुणे जिल्ह्यातील धामणी (ता. आंबेगाव) येथे खंडोबाच्या यात्रेमध्ये कै. तुकाराम खेडकरांसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाने आपली कला सादर केली.
- मायबाप सरकार पुन्हा निर्बंध लावू नका...
लोकनाट्य तमाशा म्हंटल की गावोगावी जाऊन जत्रा, यात्रा, उरुस यामध्ये आपली कला सादर करणे. लोकांचे मनोरंजन करणारा १०० ते २०० कलाकारांचा संच. पारंपारिक गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशी तीन टप्यात तमाशा सादर करण्याची पद्धत आहे. या तमाशाला आता परंपरा न जपता आधुनिक रेकॉर्ड डान्स, सिनेमातील गाणी सादर करावी लागत आहेत. तमाशाचे बदलते रुप, भरमसाठ वाढलेला खर्च, बॅका पतपुरवठा करत नसल्याने सावकाराच्या कर्जात अडकलेले तमाशा फड मालक तसेच शहरी लोकांचा तमाशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन, त्यामध्ये आलेला कोरोना हा तमाशा मालक, कलावंत, कामगारांचा पुरता बोजवारा उडवून गेला आहे. तरीही दोन वर्षांनंतर तमाशा यात्रा, जत्रामध्ये शासनाच्या परवानगीने सज्ज झाला आहे.
- तमाशा कलावंतांच्या व्यथा -
तमाशा कलावंत कामिनी अहिरे म्हणाल्या की, खूप हालाकीचे दिवस काढले आहेत. भांडी, धुनी धुवून दिवस काढले आहेत, मिळेल ते काम केलं. आता सरकारला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमची सहनशक्ती बघू नका. आम्ही गेली दोन वर्षे खूप सहन केलं आहे. आम्ही तुम्हाला मदत मागत नाहीत. तुम्हाला द्यावीशी वाटली तरच द्या, देवाने कला दिली आहे ती दाखवून आम्ही पोट भरत आहोत, ते थांबवू नका. हे आम्हाला सहन होत नाही, ही हात जोडून विनंती, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केलं आहे. तर, तमाशा कलावंताचे जीवन खूप अवघड आहे. खूप संकटांना तोंड द्यावं लागतं, कधी कधी आमच्यावर दगडफेक होते. तमाशा कलावंतांना प्राधान्य नाही. भजनी, ऑर्केस्ट्रा यांना प्राधान्य आहे, अशी खंत देखील इतर कलावंतांनी व्यक्त केली आहे.