पुणे : पुणे जिल्हा परिषदेमधील 34 खात्यांतील 889 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या नोकर भरतीसाठी जिल्हा परिषद आत्ता स्वतः अभ्यासक्रम आणि पॅर्टन तयार करणार असून ही परीक्षा एजन्सीद्वारे होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली. तसेच ही भरती प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे. याभरतीमध्ये कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक होणार नाही. अतिशय पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे.असे आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
889 पदांसाठी भरती प्रक्रिया: जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्षभरात विविध घेण्यात आलेल्या उपक्रमाची तसेच 34 खात्यांतील 889 पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुष प्रसाद म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची भरतीसाठी इंडियन बैंकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस या संस्थेशी करार केला असून या एजन्सी मार्फत ही भरती प्रक्रिया ही राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत ३४ विभागातील कर्मचाऱ्यांची भरती होणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जातील.अस देखील यावेळी प्रसाद म्हणाले.
प्रश्नपत्रिका एजन्सीद्वारे सेट करणार: नोकर भरतीसाठीची प्रश्नपत्रिका ही आयबीपीएस या एजन्सीद्वारे सेट केले जाणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाची पद्धत, पॅटर्न हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होतील. तसेच, परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वीच प्रश्नपत्रिका ही संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका लीक होणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
शाळांना नोटीस पाठविण्यात आली: जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सीबीएसई बोर्डाच्या शाळांना त्यांची सर्व माहिती अपलोड करण्याची सूचना देण्यात आल्या असल्या तरी, काही शाळांनी माहिती अपलोड केली आहे. मात्र अद्यापही ५७ शाळांनी ही माहिती भरलेली नाही. त्यामुळे या शाळांना नोटीस पाठविण्यात आली असून, त्यांना ४८ तासांत माहिती भरावी लागेल. असे देखील यावेळी आयुष प्रसाद म्हणाले.