पुणे - सतत संशय घेणाऱ्या पतीचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून आणि गळा आवळून पत्नीने खून केला. त्यानंतर बाथरूममध्ये मृतदेह लटकावून आत्महत्येचा बनाव रचला. परंतु अंत्यसंस्कार करतेवेळी 13 वर्षीय मुलीच्या अश्रुंचा बांध फुटला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला. खडक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पत्नीला अटक केली आहे.
गुरुवार पेठेतील घटना -
दीपक बलवीर सोनार (वय 36) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी राधिका दीपक सोनार (वय 34) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पुण्यातील गुरुवार पेठेत ही घटना घडली.
असा केला बनाव -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक आणि राधिका मुलीसोबत गुरुवार पेठेत राहत होते. दीपक एका जुन्या वाड्यात सुरक्षारक्षकाचे काम करतो तर पत्नी राधिका एका कपड्याच्या दुकानात काम करते. दीपकला दारूचे व्यसन होते. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय देखील घ्यायचा. यातून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. सोमवारी रात्री राधिका कामावरून उशिरा घरी आली तेव्हा त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी राधिकाने रागाच्या भरात लाकडी बॅटने त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि गळा दाबला. यामध्ये दिपकचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार घरात असणाऱ्या तेरा वर्षीय मुलीने पाहिला होता. त्यानंतर राधिकाने पोलिसांना संशय येऊ नये यासाठी बाथरूममध्ये दोरीच्या साह्याने दीपकचा मृतदेह लटकवला आणि घर बंद करून ती बाहेर गेली.
मुलीच्या अश्रुंचा बांध फुटला -
दोन दिवसानंतर परत आल्यानंतर तिने दिपकने गळफास घेतल्याचा गाजावाजा केला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवत अकस्मात मृत्यूची नोंद केली. दिपकच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना मात्र उपस्थित असणाऱ्या 13 वर्षीय मुलीच्या अश्रुंचा बांध फुटला आणि तिने रडत रडतच आईनेच वडिलांचा खून केल्याचे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राधिका सोनार हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. खडक पोलिस अधिक तपास करत आहेत.