पुणे Sushma Andhare On Devendra Fadnavis : नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मलिक अल्पसंख्याक असल्यानं फडणवीस यांची भूमिका बदलली आहे का, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी मलिक यांच्यावरुन महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महायुतीत बिघाडी ? : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं चित्र विधिमंडळ अधिवेशनात पाहायला मिळालं. त्यामुळं राज्यात चांगलाचं गदारोळ सुरू आहे. मात्र, मलिकांनी कोणाला पाठिंबा दिला, याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं मलिक नेमके कोणत्या गटात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळं त्यांना महायुतीत सहभागी करता येणार नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली.
दूरदर्शीपणा फडणवीसांना सुचला कसा : अजित पवार, नवाब मलिक यांच्यात दोन ते तीन बैठका झाल्या. पण मलिक यांच्या प्रकरणामागील राजकारण वेगळं आहे. अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर चर्चा होण्याची गरज आहे. मात्र मलिक प्रकरणावर पुढील तीन ते चार दिवस चर्चा होणार आहे. सत्तेपेक्षा देश मोठा असतो, हा दूरदर्शीपणा फडणवीसांना सुचला. भावना गवळी, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांना निर्दोष सोडण्यात आलेलं नाही. तरीही ते सत्तेत महत्त्वाच्या पदांवर आहेत. कंबोज सारख्या व्यक्तीला बढती मिळतेच कशी असं, म्हणत अंधारे यांनी फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले.
हेही वाचा -