पुणे - खासदार सुप्रिया सुळे यांची 'संवाद यात्रा' आज(26 ऑगस्ट) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भिमाशंकर येथे पोहचली आहे. चौथ्या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंनी भिमाशंकर चरणी महाअभिषेक करुन 'महाराष्ट्रावरील दुष्काळी संकट दुर होऊन राज्यात सुख समृद्धी येऊ दे' अशी प्रार्थना केली.
भाजपचे राज्यातील संघटन मजबुत असताना त्यांना आयात लोकांची गरज का पडायला लागली, असा खोचक सवाल यावेळी सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. 'मुख्यमंत्र्यांनी ज्या लोकांवर टिका केली होती त्यांनाच भाजपमध्ये घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न ते करत आहेत', अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली. राज्यात पुढील काळात सरकार कुणाचेही आले तरी मंत्रीपदे राष्ट्रवादीच्या विचारांच्या लोकांकडेच असतील असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांत सुप्रिया सुळेंची 'संवाद यात्रा' निघणार असून हि यात्रा आज भिमाशंकर येथे पोहोचली आहे. यावेळी, भिमाशंकर येथे आलेल्या भाविकांशी आणि तरुणींशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. महाअभिषेकादरम्यान सुप्रिया सुळेंसह माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, भिमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.