पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, प्रचारातील काही मुद्द्यांनी राजकारण फार तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. दुसरीकडं, या वक्तव्यावरून महायुतीमध्येच बेबनाव सुरू असल्याचं विविध नेत्यांच्या माध्यमांमधील प्रतिक्रियांवरून दिसत आहे. याबाबत भाजपा नेते विनोद तावडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "'बटेगे तो कटेंगे' हे वास्तव असून, त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जातीजातीमध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीनं घेत असतात, त्यामुळं काहीजणांकडून याला विरोध दर्शवण्यात येतोय."
राज्यात महायुतीचं सरकार येईल : भाजपा नेते विनोद तावडे यांची शुक्रवारी (15 नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय. राज्यात प्रचार दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत मिळवेल, असं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या, त्यामुळं अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करणं गरजेचं होतं, महाविकास आघाडीपेक्षा केवळ 0.3 टक्के मतं महायुतीला कमी होती. आता अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं मत विभाजन होऊन महायुतीला चांगल्या जागा मिळतील. मनसे मानसिकदृष्ट्या महायुतीसोबत आहे, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर येईल," असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा केवळ भ्रम : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भर पावसात सभा घेतली. "शरद पवार यांच्या सभेचं नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठं आहे हे पाहून आयोजन करते. त्यांच्या सभा ज्याठिकाणी होतात, तिथं पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रमनिरास आहे," असा टोला त्यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेवरून लगावला.
उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी : "राज्यात 'लाडकी बहीण योजना' लोकप्रिय झाली. शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना राबवताना इतर सर्व खात्याचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, स्वतःच्या जाहीरनाम्यात योजना राबवणार असल्याचं सांगत दुटप्पी भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरे हे राम मंदिर, हिंदुत्व, कलम 370 ला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत गेले. त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणं आणि आघाडीसोबत जाणं हे राज्यातील जनतेला पटलं नाही. जातीनिहाय जनगणना करुन लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत असून, याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी," असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं.
मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही : महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत विनोद तावडे यांना विचारलं असता ते म्हणाले, "मी राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा आणि महायुती सरकार येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल."
हेही वाचा