पुणे - ज्यांच कुटुंबच नाही ते आमच्या कुटुंबाची काय चिंता करणार, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर लगावला आहे. आज पंतप्रधान मोदी यांची वर्धा येथे प्रचार सभा होती. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. त्यावर ईटीव्ही भारतशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुकांना आता २ आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी आपल्या प्रचार यंत्रणेत गती आणली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी वर्ध्यामध्ये सभा घेतली. महाराष्ट्रातील ही त्यांची पहिलीच सभा होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना फैलावर घेतले. तर, त्यांच्या कुटुंबीयांवरही अनेक आक्षेप नोंदवले. शरद पवारांच्या कुटुंबात राजकारणावरुन फुट पडली आहे, असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते.
आमचे कुटुंब संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श कुटुंब आहे. ज्यांना कुटुंबच नाही ते आमच्या कुटुंबाची काय चिंता करणार. देशाच्या विकासाचे प्रश्न असताना मोदी पातळी सोडून भाषण करत आहेत. देशाचे पंतप्रधान बेरोजगारी, शेतकरी आणि हमीभावाचा प्रश्न सोडून वयक्तीक टिका करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर बसत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
ज्या मुद्द्यावर देशातील नागरिकांनी नरेंद्र मोदींना निवडून दिले त्या मुद्द्याचाच त्यांना आता विसर पडला. त्यांचे हे विधान निराशेतून आले आहे. त्यांच्या ५ वर्षांच्या काळाचा लेखाजोखा त्यांनी अद्याप दिलेला नाही. महाराष्ट्रात पवारांवर टीका केल्याशिवाय कोणही बातम्यांची हेडलाईन होऊ शकत नाही हे मोदींना ठाऊक आहे. त्यामुळे हेडलाईन बनण्यासाठीच त्यांनी हे भाषण केले, असा आरोपही सुळे यांनी यावेळी केला.
शरद पवारांच्या कार्यकाळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात केला. त्यावरुनही सुप्रिया सुळे यांनी मोदींना फटकारले आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी ती वाईटच आहे. त्यांच्या काळात किती आत्महत्या झाल्या आणि आमच्या काळात किती आत्महत्या झाल्या याची आकडेवारी काढून त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला सुळे यांनी मोदींना दिला आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाच पटीने वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणाचेही सरकार असले तरी त्यांनी इतके असंवेदनशील असू नये. या देशात सर्वात जास्त शेतीविषयक माहिती शरद पवारांनाच आहे हे खुद्द नरेंद्र मोदी यांनी सांगितले, अशी आठवणही सुळे यांनी करुन दिली.
शरद पवार निवडून येणार नाहीत याचा अंदाज आल्यामुळे पवारांनी निवडणूकीतून माघार घेतली, असा टोलाही मोदी यांनी लगावला होता. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका घरातून जास्त लोकांनी निवडणूक लढू नये असे शरद पवारांचे म्हणणे आहे. तेच त्यांनी पक्षाच्या समोर मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय हे पवारांच्या घरात होत नाहीत तर पक्षाच्या कार्यालयात आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर होतात. त्यामुळे पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पवारांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, असे सुळे यांनी स्पष्ट केले.