पुणे - इतिहास प्रेमी मंडळ आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने प्रख्यात गायक आणि संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबुजी यांना 100 व्या जन्मदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. 'उठा चला राष्ट्रवीर हो'... या गीताने 1 हजार विद्यार्थ्यांनी समूहगीताच्या माध्यमातून ही संगीतरुपी मानवंदना दिली.
क्रांतिकारक सुधीर फडके काहीकाळ पुण्यात टिळक रस्त्यावरील चित्रकुटी येथे रहात होते. त्यामुळे इतिहास प्रेमी मंडळ आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने त्यांना समूहगायनाद्वारे टिळक रस्त्यावरील चित्रकुटी या त्यांच्या निवासस्थानी आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या समूहगीताने सगळा परिसर दुमदुमून गेला होता.
मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक सुधीर फडके हे अवघ्या महाराष्ट्राचे आदरस्थान आहेत. त्यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे देखील समूहगीत सादर करून आदरांजली वाहण्यात आली.