पुणे - लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक रेल्वेने जम्मू काश्मीरला रवाना झाले. जम्मू-काश्मीरचे 1हजार 27 विद्यार्थी आणि नागरिक पुण्यात अडकून पडले होते.
राज्य शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला पाठपुरावा केला. त्यानंतर या अडकलेल्या लोकांना परतण्यासाठी परवानगी मिळाली. जम्मू काश्मीरचे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने पुण्यातून रवाना झाले. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांचा यात समावेश होता.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या नागरिकांकडून हमीपत्र भरुन घेणे, आरोग्य तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना रेल्वेने त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.