पुणे - राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तालुका करून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
पुण्यातील विद्यार्थी आक्रमक
राज्यातील 109 केंद्रांवर ही परीक्षा रविवारी होणार होती. 40 हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार होते. प्रशासनाकडूनही परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांकडून काही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. दोन दिवस आधी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकार कसा काय घेऊ शकते? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
हेही वाचा - राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन
एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी
एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागणी केली होती. नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. लॉकडाऊनमुळे एमपीएससीचे राज्यभरातील सर्व क्लासेस, अभ्यासिका बंद आहेत. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस बंद असल्याने गैरसोय झाली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी यासाठी मागणी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ही बाब गांभीर्याने लक्षात घेता पोरांच्या जीवांशी खेळ न खेळता ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलावी अशी मागणी आहे.
राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन
याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नव्हते तरी त्यांची भूमिका सकारात्मक होती. राज ठाकरेंच्या या फोननंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. ११ एप्रिलला एमपीएससीची परीक्षा होणार होती, राज्यातील कोविडचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बैठकीत परीक्षा पुढे ढकलली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कडक लॉकडाऊन बाबत चर्चा होण्याची शक्यता