बारामती - बारामतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती उद्या(4 मे) रात्री बारा वाजल्यापासून पुढील सात दिवस पूर्ण बंद राहणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. याबाबत नुकतीच बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक बैठक पार पडली.
बारामती शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढवणारा ठरत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बारामतीत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पवार यांनी रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामती प्रशासनाने दिनांक ५ मेपासून पुढील सात दिवस शहर व तालुक्यातील सर्व आस्थापना पूर्णतः कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सात दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखी सात दिवस टाळेबंदी कायम राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा-स्तुत्य उपक्रम! उरणच्या कोव्हिड सेंटरमध्ये 30 खासगी डॉक्टर देणार विनामूल्य सेवा!