पुणे - कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले निर्णय घेवून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. या सर्व संकट काळात राज्यातील विविध पत्रकार हे बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून या सर्व पत्रकार बांधवांना 'फ्रंटलाइन वर्कर' दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या आधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही मागणी पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पत्रकारांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, 'कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. यामध्ये सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेऊन कोरोना रोखण्यासाठी प्रभावी काम केले आहे. याचबरोबर राज्यातील नागरिकांना मोफत लसीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या सर्व संकटकाळात राज्यातील विविध पत्रकार बांधव हे बातमीदारी करण्याच्या निमित्ताने सातत्याने घराबाहेर असतात आणि त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. यातून पत्रकारांचे कुटुंबातील सदस्यही मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकतात.'
धावपळीच्या जीवनामुळे पत्रकारांचे स्वत:कडे दुर्लक्ष -
पत्रकारिता ही समाजमनाचा आरसा असून संकटाच्या वेळी समाजासाठी पत्रकारांनी सातत्याने मोठे काम केले आहे. नागरिकांना धीर देत त्यांच्या समस्या मांडून सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच ते सातत्याने चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र, धावपळीच्या जीवनामुळे अनेक पत्रकारांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे कुटुंबीय ही सातत्याने काळजीत असतात.
इतर राज्यांनी घेतला आहे निर्णय -
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात ही तातडीने सर्व पत्रकारांनचे लसीकरण लवकरात लवकर करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
हेही वाचा - मुंबईत 6082 रुग्णांची कोरोनावर मात, 1717 नवे रुग्ण