पुणे - जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी आढावा घेतला. यानंतर बोलताना त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजनचा पुरवठा, लस उपलब्धता यावर भाष्य केले. 'लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार', असे सांगत 1 मेपासून होणाऱ्या लसीकरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच राज्यात कुणाला नवीन कोविड सेंटर उघडायचे असेल, तर आरोग्य विभागाशी बोलूनच परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात 30 प्लांट सुरू करण्याचे नियोजन -
महाराष्ट्रातले बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट आपण चालू करण्यात येणार आहे. साखर कारखान्यामध्ये ही ऑक्सिजन निर्मोतीचा प्रयत्न चालू आहे. पुणे शहरात येत्या काळात 30 प्लांट सुरू करण्याचे नियोजन आहे.
देशभरातले जेवढे ऑक्सिजन प्लांट आहेत, त्यांना केंद्राने अधिपत्या खाली घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीरचा कोटा कमी करण्यात आला असून त्यासंदर्भात ही आम्ही केंद्रांशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य सरकरकडून लस मोफत देण्यासंदर्भात 1 मे रोजी मुख्यमंत्री बोलतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
सीबीआयने निरपेक्ष चौकशी करावी -
आज सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. या संदर्भात बोलताना, 'कोर्टाच्या आदेशानुसार त्याची चौकशी सुरू आहे, मी सकाळपासून पुण्यात आहे. माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. आता सीबीआयने केस हातात घेतली. त्यामुळे त्यांची चौकशी होत आहे. चौकशीला आमच्याकडून सहकार्य केले जाईल. मात्र, चौकशी करताना निरपेक्ष भावनेतून चौकशी करावी, एवढच सांगेन', असे त्यांनी म्हटले.
आम्ही सर्व खबरदारी घेऊन प्रचार केला -
पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या फेरनिवडणूकीनंतर पंढरपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली, यासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. आम्ही सर्व खबरदारी घेऊन प्रचार केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.