पुणे - राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलन होऊ शकतात तर मग मराठा क्रांती मोर्चाचा आवाज का दाबला जात आहे? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी उपस्थित केला आहे. पंढरपूर येथून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा आणि मशाल मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. कार्यकर्त्यांना नोटीस देत संपूर्ण सोलापूर जिल्हात संचार बंदी लागू केली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होणाऱ्या मशाल मोर्चाला देखील परवानगी नाकारली.
आमच्या सोबतच का दुजाभाव -
मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसह मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. नंतर प्रकाश आंबेडकरांसह नऊ जणांना मंदिरात प्रवेश देत त्यांना विठ्ठलासह रुक्मिणीचे मुखदर्शनही देण्यात आले होते. भाजपा देखील राज्यात विविध ठिकाणी अर्णब गोस्वामीच्या मुद्द्यावरून आंदोलने करत आहे. स्वत: सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने देखील अनेक ठिकाणी मेळावे घेतले आहेत. या सर्वांना परवानगी मिळते. फक्त मराठा समाजाच्या मोर्चांना आणि आंदोलनांना परवानगी नाकारली जात आहे. हे सरकार मराठा समाजासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप धनंजय जाधव यांनी केला.
विविध कारणांमुळे मराठा समाज संतप्त -
मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजामधील हा रोष विविध आंदोलन आणि बैठकांमधून व्यक्त होत आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय, यासारख्या राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे. आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थ्यांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या सर्व आघाड्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले. मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती योग्य तो निर्णय घेण्यात अपयशीच ठरली नाही, तर स्वतः अशोक चव्हाणही गोंधळात असल्याचा आरोप आंदोलक करत आहे.
आज पाच वाजता मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा -
सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चातर्फे आज संध्याकाळी ५ वाजता मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मशाल मोर्चा शांततेत काढण्यात येणार असून, मशाली प्रतिकात्मक असतील. तसेच सर्व नियम पाळून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, असे मोर्चेकऱ्यांतर्फे सांगण्यात आले. मात्र, तरीही मातोश्री आणि पंढरपूरला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.