पुणे - केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे, असे असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होते. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने फेरविचार याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
सरकार तोंडावर कुलूप लावल्या सारखे गप्प बसले आहे -
102 व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचे राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, याबाबत संभ्रम होता म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जर राज्य सरकार काही करत नसतील तर आम्ही देवेंन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेणार, असे देखील मेटे म्हणाले. मराठा आरक्षण रद्द बाबत जे झाले, त्या सगळ्याला जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. अशोक चव्हाणांनी केंद्राचे आभार मानायला पाहिजे, परंतु ते 'नाचता येईना अंगण वाकडे', असे वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सगळ केंद्र सरकार करणार असेस, तर मग तुम्ही काय करणार, असा प्रश्नही त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. न्यायालयाचा निकाल येताच EWS चे आरक्षण लागू करायला पाहिजे होते. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही, मात्र, सरकार तोंडावर कुलूप लावल्या सारखे गप्प बसले आहे, हे सरकार आणि त्यामधील लोक नाकर्ते आहेत, ते फक्त खुर्च्या उबवत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा - राज्यातील रुग्णवाहिकांना चंद्रपूर पॅटर्नचा दणका; परिवहन विभागाकडून भाडेदर निश्चित