दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील वाखारी , केडगाव येथील बावीस फाटा या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने 6, 400 लिटर कच्चे रसायन व 70 लिटर तयार गावठी दारू तसेच गावठी निर्मितीसाठी लागणारे साहित्य लोखंडी बॅरल, थाळी व ड्रम नष्ट करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने ही कारवाई केली आहे.
दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रीतीने गावठी दारू निर्मिती करणारे अड्डे सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. यावरून दौंड तालुक्यातील केडगाव व वाखारी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या गावठी दारू निर्मिती अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 1,40,900 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. वी. ढवळे, एस. के. कान्हेकर (उपनिरीक्षक) तसेच कॉन्स्टेबल चंद्रकांत इंगळे, मोहन गवळी व प्रमोद खरसडे यांनी केली.
हेही वाचा-अकोल्यातील मेडिकलचा मदतीचा हात; ना नफा, ना तोट्यात विकत आहे रेमडेसिवीर इंजेक्शन
पाटबंधारे विभागाच्या जागेत सुरू होती दारू निर्मिती
पाटबंधारे विभागाच्या जागेत अनेक ठिकाणी गावठी दारू निर्मिती भट्ट्या चालू असल्याबाबत यवत येथील पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता शं. मा. बनकर यांनी यवत पोलीस व राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांच्याकडे माहिती दिली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातदेखील अधिकाधिक कडक कारवाई करण्यात येईल असे निरीक्षक बी. वी. ढवळे यांनी सांगितले.
हेही वाचा-राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने खास लोकांचे लसीकरण केले, भाजपचा आरोप