पिंपरी-चिंचवड - शहरामधील अति वयोवृद्ध व अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांचे घरी जाऊन सुलभरित्या कोविड लसीकरण करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. आज प्रत्यक्षरित्या अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्या कोविड लसीकरणाची महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
लसीकरण घरी करण्यात आले
पिंपरी-चिंचवड भागातील सांगवीतील ढोरे नगर येथे ७५ वर्षीय व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. तर बिजलीनगर येथील रेल विहारमधील ८८ वर्षीय व्यक्तीचे लसीकरण सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन्ही लसीकरण हे घरी करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, तालेरा रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. विद्या फड-मुंढे, डॉ. सीमा बडे-मोराळे उपस्थित होते.
मोठया प्रमाणावर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने हाती घेतले
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मायक्रो प्लानिंग करून प्रभाग स्तरावर कोविड दक्षता समित्यांची स्थापना करण्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सूरू करण्यात आली आहे. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने हाती घेतले आहे. लसींची उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले आहे. लसीकरण केंद्रांवर येवून लस घेवू न शकणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामधील अति वयोवृद्ध व अंथरुणावर खिळलेल्या तसेच गतिमंद नागरिकांचे घरी जाऊन सुलभरित्या कोविड लसीकरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.