पुणे : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे समजून प्रत्येक रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे. अशी भूमिका घेणारे पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या बॅरिएट्रिक (लठ्ठपणा) वॉर्डचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या करण्यात आले.
महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय : बॅरिएट्रिक वॉर्डची क्षमता (खाटांची संख्या) १० असून नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती हा वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय हे बॅरिएट्रिक सर्जरी वार्ड असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. ससून हॉस्पीटलमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी पुर्णपणे मोफत केली जाते. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे सुप्रसिद्ध बॅरिएट्रिक सर्जन आहेत. तसेच शासकीय रुग्णालयात ऑपरेशन करणारे एकमेव सर्जन आहेत.
लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियान : महाराष्ट्र शासनाने ४ मार्च २०२३ पासून राज्यामध्ये लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियाना अंतर्गत लठ्ठपणावरील उपचार म्हणून या वॉर्डची सुरुवात करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्रातील जनतेने या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या विभागात दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. विभागामध्ये शस्त्रक्रीया झालेल्या १०० ते १६० किलो वजनाच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांचा सर्व औषधोपचारही मोफत करून रुग्णांची रुग्णालयाविषयी असणारी चांगली भावना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बॅरिएट्रिक सर्जरी करणारे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व डॉ. अमेप ठाकूर यांचे विशेष कौतूक केले. तसेच राज्य शासनाच्या लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियानांतर्गत ससून रुग्णालयाच्या भरिव कामगिरीबद्दल त्यांनी अधिष्ठातांची विशेष प्रशंसा केली. डॉ. संजीव ठाकूर अधिष्ठाता पदावरती असूनसुद्धा रोज ऑपरेशन थिएटरमध्ये जाणारे एकमेव डिन आहेत.
बॅरिएट्रिक सर्जरी मोफत : ससून हॉस्पीटलमध्ये लठ्ठपणावरील सर्जरी (बॅरिएट्रिक सर्जरी) पूर्णपणे मोफत आणि दुर्बिनीद्वारे केली जाते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तरी समाजातील रुग्णांनी याचा पूरेपूर फायदा घ्यावा.असे देखील यावेळी डॉ.संजीव ठाकूर म्हणाले.
20 रुग्णांची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया : डॉ संजीव ठाकूर म्हणाले की, जेव्हा मी जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतली तेव्हा पासून ते आत्तापर्यंत जवळपास 20 रुग्णांची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात आली आहे. यात 4 महिलांवर आणि आठ पुरुषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अगदी 36 वर्षांच्या महिलेपासून ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. या सर्वांना लठ्ठपणासह काही ना काही आजार होता. पण त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर पूर्वी त्यांना जो त्रास होत होता तो आता होत नाही.
हेही वाचा -