पुणे - जुन्नर तालुक्यातील बौद्ध कालीन लेण्यांमध्ये वसलेला अष्टविनायकांपैकी सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मज. या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. या ठिकाणी स्थित गुहेत पार्वतीला गजानन प्रसन्न झाला; आणि त्याच गुहेत श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. आत्मज म्हणजे पुत्र. यामुळेच लेण्याद्रीच्या गणेशाला गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.
350 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर या ठिकाणी एकूण 28 लेण्या आहेत. गिरिजात्मजाचे मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात. सहाव्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस टेकडीचे स्वरुप आहे. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परिसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 कि.मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून सुमारे 97 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. लेण्याद्रीच्या पायऱयांवर मोठी जत्रा असते. तसेच मंदिर परिसरात पायथ्याशी बाजारपेठ देखील आहे. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी बसण्यास परवानगी नाही. लेण्याद्रीच्या लेण्यांमध्ये रेखीव आणि भव्य सभामंडप पाहायला मिळतो. या मंडपाला कुठेही खांबाचा आधार नाही. पार्वतीने तपश्चर्या करून प्रकट केलेला हा अष्टविनायकांपैकी एकमेव गणेश आहे. त्यामुळे लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे महत्त्व पुराणांमध्ये अगणिक आहे.