पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील मुतय्या पोलकम (वय- 68) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, दत्ता उर्फ राजेश सुनील पोलकम (वय- 38), असे आरोपी मुलाचे नाव आहे. पैशांच्या वादातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनील पोलकम हे गेल्या तीस वर्षांपासून दापोडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आणि एक मुलगा होता, तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली होत्या. दरम्यान, दोघींना त्यांनी घटस्फोट दिला होता. त्यानंतर ते दापोडी परिसरात एकटेच राहात होते. त्यांना पेन्शनमधून चांगले पैसे मिळायचे. त्यामुळे आरोपी मुलगा हा वडिलांकडे पैशासाठी तगादा लावत होता. त्याला पैशातून छोटा टेम्पो घ्यायचा होता. त्यामुळे मंगळवारी दुपारी तो वडील राहत असलेल्या ठिकाणी गेला. तिथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला यातूनच वडिलांच्या डोक्यात आरोपी मुलाने दगड घातला. त्यांचे हात, पाय आणि तोंड खुर्चीला बांधले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले. मात्र, अशा स्थितीतही सुनील हे आवाज करत होते. शेजाऱ्यांच्या लक्ष्यात आले. मात्र, बाहेरून कुलूप असल्याने त्यांनी फारस लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला.
आरोपी मुलाला भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडीक, आशिष गोपी, अजय डगळे यांनी केली आहे.