बारामती (पुणे) - राज्यातील विजेची मागणी वाढत असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास होणे व मोठ्या प्रमाणात वापर करणे अपरिहार्य होते. या अनुषंगाने बारामतीतील 12 शासकीय कार्यालयांवर आता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज बिलापोटी होणारा लाखोंचा खर्च वाचवता येणार आहे.
छतावर सौर पॅनल बसविण्यात येणार
बारामती शहर व तालुक्यातील विविध 12 शासकीय कार्यालयांच्या छतावर लवकरच सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. या 12 शासकीय कार्यालयांमध्ये येथील न्यायालय, रुई ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजचा प्रामुख्याने समावेश आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पारेषण सलग्न सौर विद्युत संच बसविणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या उपलब्ध टेरेसपैकी सावली विरहित क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाच्या मंजूर वीज वापर क्षमतेनुसार व रोहीत्राच्या क्षमतेच्या 70 टक्के भार ग्राह्य धरला जातो. त्यामुळे या प्रकल्पाची 936 किलो वॅट क्षमता असल्याचे महाऊर्जा व्यवस्थापनाने सांगितले.
कार्यालयनिहाय सौर प्रकल्प व क्षमता (किलो वॅट)
- प्रशासकीय भवन – 28
- अभियांत्रिकी भवन – 19
- कृषी भवन - 9
- न्यायालय इमारत – 59
- आरटीओ (उपप्रादेशिक परिवहन) - 39
- ग्रामीण रुई रुग्णालय - 24
- उपजिल्हा रुग्णालय सिल्व्हर जुबिली – 67
- विश्रामगृह बारामती - 23
- विश्रामगृह मोरगाव - 3
- महिला हॉस्पिटल - 89
- मेडिकल कॉलेज - 490
- ऊर्जा भवन - 86
उपलब्ध टेरेस क्षेत्र
16 हजार प्रशासकीय भवन, 10 हजार कृषी भवन, 10 हजार अभियांत्रिकी भवन, अशा 12 प्रशासकीय इमारती मिळून 2 लाख 27 हजार 759 स्क्वेअर फुट टेरेस उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे वीज बिलात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे बचतीचा पैसा प्रशासकीय व जनहितासाठी उपयोगी पडणार असल्याचे मुख्य अभियंता महावितरण बारामती परिमंडलचे सुनील पावडे यांनी सांगितले.
हेही वाचा - दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची मागणी, पासलकरांनी घेतली वडेट्टीवारांची भेट
हेही वाचा - पाटस-दौंड राज्यमार्गावर गॅस वाहतूक करणारा ट्रक पलटी; मोठी दुर्घटना टळली