पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आज (शनिवारी) प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज त्यांनी शहरातील विविध लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचीदेखील भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि भापकर यांच्यामध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे भापकरांनी पार्थला पाठिंबा तर दिला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. पार्थ पवार आणि मारुती भापकर एकत्र आल्यामुळे याठिकाणी राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मारुती भापकर हे स्वतः २०१४ ला मावळमधून अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यामुळे भापकर यांना या मतदारसंघाची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी जर पार्थ पवारांना पाठिंबा दिला तर येथील राजकीय गणिते बदलू शकतात.
यावेळी मारुती भापकर यांनी पार्थ पवारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेची भाजपकडून लूट होत असल्याचे सांगितले. तसेच मावळ मतदारसंघातील इतर प्रश्न सोडविण्याची विनंतीही केली.