पुणे - कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून अल्युमिनियम उत्पादनासाठी लागणारे सुटे पार्ट चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील सावरदरी येथील टौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही चोरीची घटना सुरू होती. त्याचवेळी अन्य एका सुरक्षा रक्षकाने प्रसंगवधान राखत पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतची माहिती दिली.
सापळा लावून केली अटक-
कंपनीच्या भिंतीच्या आतील बाजूस ॲल्युमिनियमचे स्पेअर पार्ट काही अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याचे कंपनीमध्ये पहारा देणाऱ्या सेक्युरिटी गार्डच्या लक्षात आले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने चोरी करणाऱ्या व्यक्तींना हटकले असता, त्यांनी सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच त्याला तिथेच पकडून ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार कंपनीत काम करत असलेल्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. त्यानतंर त्याने समयसूचकता दाखवून तत्काळ महाळुंगे पोलीस चौकी येथे संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या दिलेल्या माहितीनंतर महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दोन पथके तयार करून सापळा लावला आणि सहा चोरट्यांना अटक केली.
दोन फरार आरोपीसह भंगार विक्रेत्याचा शोध सुरू
ईश्वर ओमकार राठोड, लखन सुरेश अवचीते, निपुर नारायण दास, ईश्वर राठोड, लखन सुरेश व शिशुपाल जगदीश प्रसाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच फरारी झालेल्या आणखी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये भंगार व्यवसायिकाचाही हात असून आरोपींनी सांगितल्या प्रमाणे भंगार व्यावसायिक रशीद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत महाळुंगे पोलिसांनी सहा आरोपींनी चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे, तर दोन आरोपी आणि एक भंगार व्यावसायिक फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महाळुंगे पोलीस चौकी चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, दत्तात्रेय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, प्रदीप गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, पवन वाजे, भास्कर नागरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे हे करीत आहेत.