पुणे - गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या तरुणीचा तिच्याच चुलत भावाने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ऋतुजा विकी वाघ असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून संतोष रोहिदास भोंडवे असे तिचा खून करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे.
ऋतुजाने गुन्हेगारासोबत काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला होता. यामुळे आई, आजी आणि कुटुंबाची नाहक बदनामी झाल्याचा राग चुलत भाऊ संतोषच्या मनात होता.
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा आईकडे आली होती. तेव्हा ऋतुजाचे आई आणि आजीसोबत शाब्दिक बाचाबाची होऊन किरकोळ भांडण झाले. तू गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने आमची बदनामी झाली आहे. तू इकडे येऊ नकोस असे आईने म्हटल्यानंतर ऋतुजाने आईला मारहाण केली.
यावेळी ऋतुजाच्या आईने शेजारीच राहणाऱ्या पुतण्याला आवाज दिला. अगोदरच गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने अब्रू आणि मान सन्मान गेल्याचा राग संतोषच्या मनात होता. त्याने थेट ऋतुजाचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी संतोषला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.