पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढत आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही याप्रसंगी उपस्थित होते. बारणे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आज दुपारी निगडी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार बारणे यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबारायाचे दर्शनही घेतले. ढोल-ताशांच्या दणदणाटात, 'महायुतीचा विजय असो', 'श्रीरंग बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल करताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार तथा पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या उमा खापरे, अमित गोरखे आदी महायुतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा ध्यास घेऊन महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भगवे फेटे व झेंडे यामुळे रॅलीचा पूर्ण मार्ग भगवा झाला होता. चिंचवडचे आमदार आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांचे मनोमिलन झाल्याने, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. हे नवचैतन्य आजच्या शक्तीप्रदर्शनात पहायला मिळाले.