पुणे - पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेले लोणावळा शहर हे सलग दुसऱ्या दिवशी खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे. शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाची अज्ञात दोघांनी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. राहुल उमेश शेट्टी (वय- ४४, रा. लोणावळा) असे मृत्यू झालेल्या शिवसिनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहराचे माजी शिवसेना शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घराजवळील हॉटेलमध्ये खून
राहुल शेट्टी हे घराजवळील हॉटेलमध्ये चहा पित बसले होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राहुलशेट्टींना जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात आणि दुसरी गोळी चेहऱ्यावर लागली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
रात्रीही शहरात घडली खुनाची घटना-
दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे दादागिरीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. या खुनाच्या घटनेला काही तास होत नाहीत तोपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भरदिवसा गोळ्या झाडून खून केला आहे. नायडू खून प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.