जुन्नर (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज (शनिवार) अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट असल्याने मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला गेला.
कोरोनाच्या महामारीचा समुह संसर्ग रोखण्यासाठी यावर्षीचा शिवराज्यभिषेकाचा सोहळा भव्य स्वरुपात न साजरा करता, मावळ्यांनी घरोघरी साजरा करावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पूजन आणि अभिषेक अशा मर्यादित स्वरुपात हा दिवस साजरा करण्यात आला.
हेही वाचा... दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साधेपणाने साजरा ; कोरोना योध्याच्या केला सत्कार
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी हा गड छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. या गडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा होत असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अवघ्या पाच शिवभक्तांच्या उपस्थितीत दिवस किल्ले शिवनेरीवर साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. तसेच प्रतिमेवर फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. मंचर येथील चार तरुण आणि जुन्नरच्या शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रविंद्र काजळे यांनी हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला आहे.
शिवभक्त स्वप्निल घुले, अजित भालेराव, अक्षय भालेराव, संतोष जठार आणि शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रविंद्र काजळे हे यावेळी किल्ले शिवनेरीवर उपस्थित होते.