मावळ (पुणे) - लॉकडाऊनचा प्रतिकूल परिणाम गरीब, मजूर, स्थलांतरित कामगार, बाहेरगावचे विद्यार्थी यांच्यावर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात या जनतेचे जेवणाचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने तालुका स्तरावर देखील शिवभोजन योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याला अनुसरुन पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवनानगर येथे 'शिवभोजन थाळी केंद्र' सुरु करण्यात आले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवार) या केंद्राचे उद्घाटन केले. गावातीलच स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य अमित कुंभार हे या केंद्राचे चालक असणार आहेत.
हेही वाचा... लाॅकडाऊन: रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...
कोरोनामुळे सर्वत्र हॉटेल आणि खानावळी बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचे जेवणाचे हाल होत आहेत. शुक्रवारी केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे या काळात सर्वसामान्य गोरगरीबांचे जेवणासाठी हाल होऊ नये, त्यांना कमीतकमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी पवनानगर येथे हे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे. 'गरजू नागरिकांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घ्यावा' असे आवाहन यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. तर, 'सरकारच्या नियमांप्रमाणे गरजूंना येथे नियमित जेवण उपलब्ध करुन दिले जाईल' असे शिवभोजन थाळी केंद्राचे चालक अमित कुंभार यांनी म्हटले आहे.