पुणे - किल्ले शिवनेरी गडावर 'शिवनेरी स्मारक समिती'च्या वतीने उत्साहात तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. राज्यभरातून शिवभक्त मशाल घेऊन किल्ले शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. सनई, तुतारी, ढोल ताशांच्या गजरात हा सोहळा पार पडला.
आज सकाळी गडदेवता शिवाईदेवीला शिवभक्तांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान, असा छबिना पालखी सोहळा हरिनामाचा गजर करत पार पडला. यावेळी बाल वारकऱ्यांचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी किल्ले शिवनेरी गडावर ध्वजारोहण, पोवाडे गायन कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा असे कार्यक्रम पार पडले. दरम्यान, यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार जुन्नर येथील आदर्श शिक्षिका मनिषा आकाराम कवडे यांना प्रदान करण्यात आला.