पुणे : हिंदू कालगणनेनुसार अर्थात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (३१ मार्च) साजरी होत आहे. पुण्यातील हिंद माता प्रतिष्ठान गेल्या 30 वर्षांपासून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे. यंदाही आज शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे मोजक्यात मान्यवरांच्या उपस्थितीत लाल महालात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत शिवजयंती साजरी-
सध्या राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. राज्य सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रमांसह सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हिंद माता प्रतिष्ठानच्या वतीने लाल महालात साध्या पद्धतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारण्यात आली होती. मावळ्यांची वेशभूषा साकारलेल्या कलाकारांच्यावतीने लाल महालातील माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
लवकरात लवकर कोरोना संकट दूर व्हावं ही प्रार्थना -
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या वर्षाभरापासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. अजूनही कोरोना संकट दूर होताना दिसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोरोना संकट दूर व्हावे. पहिल्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
शिवप्रेमींमध्ये नाराजी
गडकिल्ल्यांवर यंदा शिवप्रेमींना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी बंदी घातल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, इतरही सांस्कृतिक कार्यक्रमावर बंधने येत आहेत.
हेही वाचा - पंढरपूर पोटनिवडणूक: शैलजा गोडसेंची बंडखोरी, शिवसेनेतून हकालपट्टी
हेही वाचा - धावत्या बसच्या खिडकीतून मुलीने डोके काढले बाहेर, ट्रकच्या धडकेत झाले धडावेगळे