पुणे - पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अक्षरशः हाहाकार पसरला आहे. संततधार पावसामुळे या भागामध्ये अक्षरश: जनजीवन उध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मदतीसाठी जुन्नर, आंबेगाव, शिरुर, हवेली विधानसभा मतदारसंघातून लोकांना जेवण व जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात सुरुवात झाली आहे.
सांगली आणि कोल्हापूर या भागातील परिस्थिती सध्या अतिशय भयान आहे. त्यामुळे या भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहोचावी यासाठी 'एक भाकरी पुरग्रस्तांसाठी', असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून तयार जेवण पाठवण्यास सुरुवात झाली आहे. तर या पुढच्या काळातही जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मदत पाठवली जाणार असल्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
जुन्नर, आंबेगाव, शिरुर हवेली याठिकाणी सकाळपासून स्थानिक महिलांच्या मदतीने जेवण तयार केले जात आहे. प्रत्येक तासात एक गाडी या ठिकाणावरुन रवाना केली जात आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना तयार जेवण वेळेत पोहोचविण्यासाठी मदत होत आहे. यामध्ये खेड तालुक्यातून हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूही पाठविण्यासाठी तयारी सुरु आहे.