पुणे : शिवसेना-राष्ट्रवादी-काँगेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती. मागील दोन ते अडीच महिन्यांत सरकार स्थापन करण्यात पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. सत्ता स्थापनेतील पडद्यामागील अनेक गोष्टींची उकल या प्रकट मुलाखतीमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अखेरच्या कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागूंनी सांगितले होते, 'पिंजरा' नाव आवडले नव्हते...
19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात संजय राऊत शरद पवार यांची रविवारी 29 डिसेंबरला दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत ही मुलाखत घेणार आहेत. 28 आणि 29 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे हे संमेलन आयोजित केले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
हेही वाचा - 'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'
या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून साहित्य-कलेचा राजकारणाशी संबंध येतो. या संमेलनाचे उद्घाटन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी 28 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने या मुलाखतीकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.