बारामती (पुणे) : राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर आज शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजीनाम्याच्या विषयावर शरद पवार म्हणाले की, 'मी गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यात 56 वर्षे मी विधीमंडळ अथवा संसदेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मला वाटायला लागले की पक्षात नवीन नेतृत्व तयार व्हावे, नवी टीम तयार व्हावी. त्यासाठी मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. पण राजीनाम्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया येतील असे वाटले नव्हते. मला वाटले की एक, दोन दिवस गेले की आपण समजूत काढू. पण समजूत काढण्यासारखी स्थिती अजिबात नव्हती. देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या परिस्थितीत विरोधकांची एकजुट सुरु झाली आहे. त्यामुळे मी आत्ता बाजूला राहणे योग्य नाही, असे अनेकांचे मत होते. शेवटी राजकारणात सहकाऱ्यांच्या मताचाही आदर करावा लागतो. हे लक्षात घेवून मला निर्णयात बदल करावा लागला'.
'बळाचा वापर करून प्रकल्प यशस्वी होणार नाही' : बारसू प्रकल्पाबाबत ते म्हणाले की, 'मी स्वत: तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांचे प्रश्न समजून घेतले आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या उद्योग खात्याच्या अखत्यारित येतो. त्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी माझ्या एक-दोन बैठका झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूकही होईल आणि प्रकल्पही होईल असा मार्ग निघतो का यावर चर्चा झाली. पण हा प्रकल्प करत असताना पर्यावरणाचे, शेतीचे व तेथील मत्स्यव्यवसायाचे काही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. त्या दृष्टीने पूर्ण तयारी करून स्थानिकांना विश्वासात घेवून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तेथे सक्तीने अथवा पोलिस बळाचा वापर करून प्रकल्प यशस्वी होवू शकणार नाही, आणि ते योग्यही ठरणार नाही, असे मत पवार यांनी मांडले.
'सत्तासंघर्षाचा परिणाम सरकारवर होणार नाही' : राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव त्यात आहे. परंतु सध्या भाजप व शिंदे यांचे विधानसभेत बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयात काहीही निकाल लागला तरी त्याचा परिणाम सरकारवर होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा |