पुणे - नुकताच महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकगमध्ये भाजप हा क्रमांक एक चा पक्ष म्हणून समोर आला. पण ही निवडणुक शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे ही गाजली. पवारांच्या साताऱ्यातील सभेत पवारांनी पावसामध्ये केलेल्या भाषणामुळे सर्वांनाच कुतूहल वाटत होते की, वयाच्या ७९ व्या वर्षी पवारांनी हे कसे केले. बारामतीमद्ये झालेल्या दिवाळी कार्यक्रमात याचाच प्रत्यय आला.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा दिली, शरद पवारांनी मानले आभार
महाराष्ट्राची यंदाची विधानसभा निवडणुक पवारांच्या झंझावाती प्रचाराने गाजली. गेली ५० वर्षे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात पवारांचा व्यासंग आहे. दिवाळीनिमित्त बारामतीमधील ग.दि.मा सभागृहात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एका बाल गायिकेने शरद पवार यांना त्यांच्या साताऱ्यातील पावसामध्ये केलेल्या भाषणावर प्रश्न विचारला यावर पवारांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. त्या चिमुरडीने प्रश्न केला की मला कविता करता येतात, पण तुम्ही इतकी छान भाषण कशी काय देता. त्यावर पवार म्हणाले, मी भाषण देऊ शकतो पण कविता करू शकत नाही. त्यामुळे तुझी आणि माझी परिस्थिती सारखीच आहे. मी जेव्हा पावसात भिजायला जाते तेव्हा माझे आजोबा मला खूप रागावतात. पण तुम्ही एवढ्या मोठ्या पावसात कसं काय भाषण दिले. या प्रश्नाला हसून दाद देत पवार म्हणाले, की तुझे आजोबा तुला रागावत असले तरी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मत दिली. पवारांच्या या मिश्कीलपणे दिलेल्या उत्तरावर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.