बारामती (पुणे) - राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. जनावरासांठी छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना २ पैसे मिळत असताना टॉमॅटो आयात करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना यातना देण्याचे दुःखावर डागण्या देण्याचे काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, नवाब मलिक यांची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नातेवाईकांशी काल संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. आज मलिक यांच्याशी संपर्क करणार आहे.
तुम्हाला संधी देऊन काय दिवे लावले?- मणिपूरचा प्रश्न फक्त संबंधित राज्यापुरता नाही. मणिपूरचा काही भाग चीनलगत आहे. तरीही सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही, हे चिंताजनक आहे. आम्ही सतत चर्चेची मागणी करूनही संसदेत चर्चा झाली नाही. मोदींच्या भाषणात मणिपूरचा फार कमी भाग होता. त्यामुळे पदरात काहीही पडले नाही. मणिपूरमधील हिंसाचाराला भाजपकडून पूर्वीच्या सरकारला जबाबदार धरले जाते. मात्र, भाजपाचे मणिपूरमध्ये ९ वर्षे राज्य आहे. तुम्हाला संधी देऊन काय दिवे लावले आहेत? 'आम्ही इंडिया'च्या बैठकीचे सर्व विरोधी पक्षांना निमंत्रण दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शिंदेच्या ठाण्यात १८ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही गंभीर बाब आहे. रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होत असताना तातडीने व कठोर पावले उचलण्याची गरज आहे-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
अजित पवार-शरद पवारांच्या भेटीमागे भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे पवारांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. अजित पवार वारंवार शरद पवार यांना भेटत आहेत, हे पाहणे मनोरंजक आहे. शरद पवारदेखील टाळत नाहीत, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'च्या संपादकीयात म्हटले आहे. भाजपाकडून चाणक्यनीतीचा वापर करत अजित पवारांची शरद पवारांसोबत भेट घडवून आणली जाते. त्यामधून गोंधळ घालण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असे 'सामना'त म्हटले आहे.
हेही वाचा-