पुणे : काही दिवसांपूर्वी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नसून संघटनेत काम द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही कार्याध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत. यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, बैठक का बोलावली आहे, हे माहित नाही. पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. तशी बैठक ते बोलवत असतात.
पक्षाची बैठक बोलावली : प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मी येत्या 6 तारखेला पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संघटनेत कुठ काही प्रश्न आहे का? तसेच महिला, युवक आणि अल्पसंख्याक अश्या शाखेत काही बदल करायचे आहे का, नवीन लोकांना संधी मिळावी अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. याबाबत तसेच प्रदेशाध्यक्ष पदाबाबत येत्या 6 तारखेच्या बैठकीत निर्णय होणार आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
अजित पवारांचा दिल्ली दौरा : अजित पवार यांच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यांनी त्यांचे दौरे रद्द केले आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार सुप्रिया सुळे मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. माझा नगरचा कार्यक्रम हा पूर्वीच रद्द झाला आहे. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पवार म्हणाले की दिल्लीला मी पण गेलो, ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते. अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. अजित पवार यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ते सगळ्यांच्या समोर बोलले की त्यांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. 6 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल मी एकटा घेत नाही. पक्ष फुटू शकतो यावर ते म्हणाले की, अशी चर्चा कोण घडवत आहे माहिती नाही. पण, आम्ही चर्चा करत नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा :