पुणे Sharad Pawar on Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनावरुन काँग्रेसवर टीका केली जाते. (Shetkari Melava Pune) परंतु, राम मंदिराच्या उद्घाटनाला कुणाचाही विरोध नाही, फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन केलं जात आहे. मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे. तरीही उद्घाटन केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पुण्यात दिली.
इंडिया आघाडीची जमेची बाजू : पुण्यातील जुन्नर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तेथे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे दिली. दिल्लीतील 'इंडिया' आघाडी बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, 'अनेक राज्याचे मुख्यमंत्री, महत्त्वाचे नेते बैठकीत सहभागी झाले. एकविचाराने निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार झालाय. जागा वाटपाचा निर्णय घेऊन काही वाद आहे, ते मिटवले जावे. याबाबत चर्चा झाली असून 'इंडिया' आघाडीचे नेतृत्व खरगेंनी घ्यावं, अशी सूचना काही सहकाऱ्यांनी केली आहे आणि अनेकांचा त्यांना पाठिंबा आहे.' पवार पुढे म्हणतात की, 'एक कमिटी नेमली जावी असं मत होतं. एकत्रित सभा घेण्यासाठी एक कमिटी व्हावी अशा अनेक सूचना मांडण्यात आल्या आहेत. आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येत आहेत. हीच इंडिया आघाडीची जमेची बाजू आहे.'
संयोजक पदाची गरज नाही : इंडिया आघाडीत नाराजी नसून संयोजक पदाची जबाबदारी नितीश कुमारांनी घ्यावी, अशी सूचना केली. मात्र, संयोजकांची गरज नसल्याचं मत नितीश कुमारांनी मांडलं होतं. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाच्या उमेदवाराविषयी बोलताना 'आम्ही कुणाला तरी प्रोजेक्ट करून त्याच्या नावानं मत मागावी, अशी गरज वाटत नाही. आम्हाला विश्वास आहे की देशाला पर्याय देऊ शकतो,' असं म्हणत 1977 सालचे उदाहरण शरद पवार यांनी दिलंय. मोरारजी देसाईंचं उदाहरण देत इंडिया आघाडीचा चेहरा नसावा, असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.
पंतप्रधानांनी लोकांच्या भावनेचा अनादर केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱया विषयीसुद्धा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'सरकारचे धोरण शेती विरोधी आहे. त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कांदा उत्पादकांना अपेक्षा होती. देशाचे पंतप्रधान राज्यात आल्याने त्यांचा सन्मान केला. मात्र, त्यांनी लोकांच्या भावनेचा आदर ठेवला असं वाटत नाही. अयोध्या राम मंदिरावरून विरोधकांवर टीका केली जात आहे. कॉंग्रेसवर टीका केली जाते. राम मंदिराचं काम अर्धवट आहे, ते पूर्ण करा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन होत आहे. कुणाचाही राम मंदिराला विरोध नाही.'
हेही वाचा: