पुणे - पंतप्रधानांनी काशीमधील घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी स्वच्छ करण्याची जबाबदारी माझी असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
आळंदीत सदगुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सुरु आहे, या क्रार्यक्रमात शरद पवार बोलत होते. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो, त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी असल्याचे पवार म्हणाले.
तुमचे जसे तुकाराम गुरु, तसे माझे यशवंतराव
तुमचे जसे गुरू आहेत तसेच श्रद्धास्थान माझे देखील आहे. त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण असल्याचे शरद पवार म्हणाले. चव्हाणसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की जी संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली, त्यांचा विसर कधी पडू देऊ नका. त्या रस्त्याने मी जात असल्याचे शरद पवार म्हणाले.
या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही....
आज आळंदीत आलो तो काही हेतू ठेवून नाही. मी सगळ्या ठिकाणी जात असतो. पण माझा हेतू याचे प्रदर्शन करणे हा नसतो. काहींचा समज आहे की, राजकारण्यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. मात्र, या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही.