पुणे - सत्तेचा गैरवापर करुन भाजप हे लोकप्रतिनिधी फोडण्याचे काम करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आपल्या संस्था टीकवण्यासाठी अनेक नेत्यांवर भाजप दबाव आणत असून, पक्षांतर करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. स्वत: राज्याचे मुख्यमंत्रीच पक्षांतरासाठी लोकप्रतिनीधींना फोन करत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. सत्तेचा एवढा गैरवापर झालेला कधी बघितला नाही. भाजपचा हा प्रकार लोकशाहीस घातक असल्याचे पवार म्हणाले.
पंढरपूरच्या कल्याणराव काळे यांचे पक्षांतरही दबावातून झाले आहे. त्यांच्या संस्था टिकवण्यासाठी त्यांच्यावर दबाब आणल्याचे पवार म्हणाले. तर पतीच्या केसमुळे चित्रा वाघ यांच्यावरही दबाव आणण्यात आला आहे. तसेच हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करावे यासाठी त्यांच्यावरही दबाव आणला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकल्याचे पवार म्हणाले.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही कर्नाटकसारखे प्रयत्न
कर्नाटकमध्ये जसे भाजपने सत्तेचा गैरवापर करत सत्ता स्थापन केली तसेच प्रयत्न मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू असल्याचे पवार म्हणाले. सत्तेच्या बळावर भाजप लोकप्रतिनीधींना धमकावण्याचे काम करत असून हे लोकशाहीस घातक आहे.