पुणे - केंद्र आणि राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर टीका केली आहे. पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सत्ता आणि पैशांचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये पक्षांतर केले आहे, असे पवार म्हणाले.
'यापूर्वी १९८० मध्ये देखील अशाप्रकारे अनेक आमदारांनी पक्षांतर केले होते. मात्र, त्यावेळी पक्षांतर केलेल्या बहुतांश नेत्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर आम्ही पुन्हा पक्षाची बांधणी केली होती. त्याप्रमाणेच सध्या आमच्याकडे १९८० च्या तुलनेत युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन चेहर्यांना संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणेच कर्नाटकमध्ये देखील भारतीय जनता पक्षाने पैशांच्या बळावर सत्ता मिळवली असून, सत्ता आणि पैशांच्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे,' असेही ते म्हणाले.
यावेळी काश्मीरमध्ये चाललेल्या लष्करी हालचालींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास पवार यांनी नकार दिला.