पुणे - कोंढव्यातील कुमार सुरक्षा या सोसायटीमधील एका इमारतीतील पाचव्या मजल्यावरील एका घरात फ्रिजचा स्फोट झाल्याने आग लागली. त्या आगीमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही घटना सोमवारी (दि. 16 डिसें) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
आगीमुळे मोठ्या ज्वाला आणि धूर पसरत होते. यात त्या घरातील मौल्यवान वस्तू भस्मसात झाल्या. त्याचबरोबर शेजारील घरेही काळवंडली आहेत. स्फोटाने घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आणि फरशी उध्वस्त झाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंब घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. यावेळी 5 ते 6 रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आग लागलेल्या घरात कोणी नसल्याने जीवित हानी टळली. या सोसायटीत दीडशे नागरिक राहतात. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली.
हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात