पुणे - यळकोट यळकोट जय मल्हार.. म्हणत सोमवती अमावस्या ते चंपाषष्ठीपर्यत कुलदैवत खंडोबाचा उत्सव साजरा होत असतो. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे पुणे जिल्ह्यातील निमगाव-दावडी खंडोबा येथे सात दिवसांच्या उत्सवा दरम्यान प्रशासनाने मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली असून देवस्थानाकडून सात दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निमगाव ग्रामस्थांनी केले आहे.
खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद..
सोमवती अमावस्या व चंपाषष्ठीला कुलदैवत खंडोबाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. नवविवाहित जोडपी कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाला येऊन जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन निमगाव ग्रामस्थ, देवस्थान व प्रशासन, पोलीस यांनी बैठक घेऊन या सात दिवसांच्या उत्सव काळात खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी ग्रामस्थ व खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांची बैठक घेतली आहे.
सोमवती अमावस्या ते चंपाषष्ठीपर्यत खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात येणार असले तरी या उत्सव काळातील धार्मिक विधी व परंपरा जपून यात्रा उत्सव साजरा केला जाणार असल्याचे खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.