पुणे - कोरोनावरील लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोविशील्ड लसीची किंमत जाहीर केली आहे. राज्य सरकारांसाठी ही लस 400 रुपये प्रति डोस दराने दिली जाणार आहे. तर तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये दराने विक्री केली जाणार असल्याचे सिरमच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
दोन महिन्यात लसीचे उत्पादन वाढवणार -
आतापर्यंत कोविशील्डचा एक डोस खासगी रुग्णालयांना 250 रुपयांना दिला जात होता. तर केंद्र सरकारला पहिल्या प्रमाणेच 150 रुपयांना ही लस उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यात लसीचे उत्पादन वाढवले जाणार असल्याची माहितीदेखील सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे.
सध्या उत्पादित होणाऱ्या लसीपैकी 50 टक्के लसीचे डोस हे केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला दिले जातात. तर उर्वरित 50 टक्के लसीचे डोस राज्य सरकारांना आणि खासगी रुग्णालयांना दिले जात आहेत. दरम्यान, सध्या जाहीर करण्यात आलेले दर हे इतर देशांच्या लसीच्या तुलनेत कमी किमतीत दिली जाणार आहे, अशी माहितीही सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे.