पुणे - आज ज्यांचे देशावर राज्य आहे त्यांचा गांधीजींच्या विचारावर विश्वास नाही, अशी टिका ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात श्रमिक रेल्वेत 90हुन अधिक कष्टकाऱ्यांचे मृत्यू, सीमेवर गोळीबारात कष्टकाऱ्यांचे मृत्यू, हाथरस येथील मुलीवर बलात्कार आणि यानंतर झालेला तिचा मृत्यू या सर्व घटनांविरोधात अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्यावतीने एकदिवसीय आत्मक्लेश उपवास करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हा आत्मक्लेश उपवास करण्यात येत आहे. यावेळी बाबा आढाव बोलत होते.
ते म्हणाले, महात्मा गांधी यांनी आम्हाला शांतता मार्गाचा संदेश दिला आहे. आज महात्मा गांधी यांची 151वी जयंती आहे. आज देशावर ज्यांचे राज्य आहे, त्यांचा गांधीजींच्या विचारावर विश्वास नाही. महात्मा गांधी यांचा जो मारेकरी होता त्यांचे ते समर्थक आहेत. आज आपल्याला संविधानाने जो भारत दिला आहे तो बनविण्यासाठी आपल्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. संविधानातील भारत बनविण्याची भाषा पंतप्रधानांनी बोलली पाहिजे. आज हे सरकार संविधानाच्या नावाने कारभार करत असले तरी संविधानविरोधी सर्व कारभार करत आहे, अशी टिका बाबा आढाव यांनी केली.
आजची परिस्थिती बघता गांधीजीची खूप आठवण येत आहे. ते असते तर आज योग्य मार्गदर्शन केले असते. संविधान रुजवण्यासाठी आम्हाला काहीही झाले तरी सविनय कायदेभंगापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे. मोदींना संघाचा विचार पुढे आणायचा आहे. त्यांना संविधानाची चिंता नाही, असा आरोपही त्यांनी केला.