(खेड) पुणे - खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या आणि त्यानंतर या राजकीय घडामोडींना लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह, राज्य राखीव दल व दंगा काबू पथकाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
सभापती पोखरकरांवर अविश्वास प्रस्ताव -
खेडचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर एकूण १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. त्यासाठी सोमवारी ३१ मे सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मतदान घेण्यात येणार आहे. हा अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर ते ११ सदस्य पुण्याजवळच्या डोणजे या ठिकाणी एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी २७ मेला पहाटे सभापती व त्यांच्या समर्थकांनी धिंगाणा केला. त्यानंतर सभापती पोखरकर व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सभापतींना अटकही झाली.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात रविवारी 18 हजार 600 कोरोनाबाधितांची नोंद, 402 जणांचा मृत्यू
संचारबंदी लागू -
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये व त्याबरोबर आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातही आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या राजगुरूनगरमध्ये १४४ कलमांतर्गत संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पंचायत समिती इमारतीच्या आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत कोणासही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाण्याची टाकी ते मारुती मंदिर दरम्यानचा वाडा रस्ता आणि तिन्हेवाडी रस्त्याचा टेल्को काॅलनीपर्यंतचा भाग, सकाळी ६ वाजल्यापासून ते सभेचे कामकाज संपेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुरव यांनी दिली.
हेही वाचा - भाजपाच्या 'त्या' नेत्यांचा शोध घ्यायला हवा - थोरात