पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने 144 (1) कलम लागू करण्यात आले आहे. पण या कलमातील तरतुदींच्या अंमलबजावणीत सौम्यता आणण्यात आली आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या सरकारी आदेशामध्ये नागरिकांना केवळ गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचाही समावेश आहे. शहरात आत्तापर्यंत 9 जणांना विषाणूची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - चिंतेची बाब..! रुग्णालयातून पळाला कोरोनाग्रस्त, प्रशासन झालं होतं त्रस्त
त्यामुळे 144 (1) कलमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या परिसरात टूर्स आणि ट्रॅव्हल्स, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस या ठिकाणी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती आणि मायदेशी परतून वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित परिसरातील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तींवर 188 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरोना असल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात सतर्कता बाळगण्यात येत असून त्यांच्या कुटुंबात देखील विषाणूने शिरकाव केलेला असल्याचे पाहायला मिळाले आहे. बहुतांश परदेशातून आलेल्या व्यक्तींनाची कोरोनाची बाधा असल्याचे वारंवार समोर येत आहे. परदेशातून नागरिक येताच त्यांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मात्र, परदेशातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकावर नजर ठेवणे शक्य नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात कलम 144 (1) कलम लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट: आजपासून बंद राहणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर