पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने पुण्यातील आठ जागांच्या वाटपाचा तिढा सोडवला आहे. चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तीन जागा काँग्रेस तर एक जागा मित्रपक्ष लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पुणे जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील पर्वती, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत. शिवाजीनगर, कसबापेठ, पुणे कॅन्टोनमेन्ट याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - पवारांचे 'युवा शिलेदार' राष्ट्रवादीला संजीवनी देतील काय?
जोपर्यंत शिवसेना-भाजप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार नाही तोपर्यंत आघाडी उमेदवार घोषित करणार नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर जात-पात असा भेदभाव न करता कामे करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
तसेच कुठल्याही परिस्थितीत पक्षाच्या विरोधात बोलू नका, सकारात्मक बोला. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच सरकार आले पाहिजे, अशी सूचनाही पवार यांनी केली.
हेही वाचा - मातोश्रीची पायरी न चढताच अमित शाह दिल्लीला रवाना
यावेळी अजित पवारांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकांच्या वेळी सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा आणला, आता कलम 370 आणले. आज देखील जम्मू काश्मीरचे नेते 50 दिवसांपासून नजरकैदेत आहेत.
हेही वाचा - प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार राहणार विजयापासून 'वंचित'?
आजही पुण्यात अनेक मतदार संघात पाण्याचे टँकर जातात. मी दहा वर्षे पालकमंत्री होतो. दुष्काळ असतानाही पुणेकरांना पाण्यासाठी वणवण फिरू दिले नाही. पुणे महापालिकेच्या कारभारावर कुणाचाही अंकुश नाही. पुण्याचे प्रश्न मांडायला मंत्री मंडळात कुणी आहे का? याचा विचार पुण्याची जनता करणार आहे का? असे अजीत पवार म्हणाले.