पुणे - दिवसेंदिवस पुण्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव भव्य-दिव्य न करता साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा ऐतिहासिक, पौराणिक आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्याने यंदा गणेशोत्सवात देखावे सादर होणार नाहीत. पण त्याची कल्पना नसल्यामुळे शहरातील काही मूर्तिकारांनी देखावे तयार करण्याच्या कामाला सुरुवातही केली होती. यंदाच्या देखाव्यात चालू घडामोडी वर भर देण्यात आला होता. यामध्ये कोरोना, आत्मनिर्भर, राम मंदिर यासारखे विषय होते. परंतु यावर्षी देखाव्यांना मागणी नसल्यामुळे देखावे साकारणाऱ्यासमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील वेगवेगळ्या गणेश मंडळासमोर पौराणिक देखावे साकारणारे सतीश तारू यांच्या कारखान्यातही काही देखावे तयार आहेत. परंतु त्यांच्या देखाव्यांना यंदा मागणीच नाही. त्यामुळे त्यांनीही हात आखडता घेत नवीन देखावे साकारणे बंद केले. जर देखाव्याची मागणी आलीच तर नव्याने तयार करून देऊ असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कारखान्यात सध्या कोरोना, आत्मनिर्भर भारत, चिनी मालाची होळी यासारखे काही देखावे तयार आहेत. परंतु आता नवीन देखावे तयार करत नाहीत.
कोरोनाचा परिणाम जसा सर्व उद्योग व्यवसायांवर झाला तसाच परिणाम या देखावे तयार करणाऱ्यांवर देखील झाला आहे.