पुणे - आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 67 व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला किराणा घराण्यातील गायक गिरीश संझगिरी यांच्या गायनाने दिमाखात सुरुवात झाली, महोत्सवाला सुरुवात होत असताना आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने जंगली महाराज रस्त्यावरील सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
हेही वाचा - पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली; दोघेही पक्ष सोडणार नाहीत - चंद्रकांत पाटील
महोत्सवाची सुरुवात करत असताना किराणा घराण्यातील गायक गिरीश संझगिरी यांनी राग मुलतानी सादर केला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. १५ डिसेंबरपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवासाठी २७० बाय २२८ फूट इतका मांडव तयार करण्यात आला असून या ठिकाणी तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्च्या अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असून, याशिवाय संपूर्ण मंडपात ६ एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत.
किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तूर यांची यंदा जन्मशताब्दी आहे. त्याचे औचित्य साधत त्यांचे शिष्य संझगिरी यांच्या गायनातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यासोबतच आजच्या पहिल्या दिवशी जयंती कुमरेश यांचे कर्नाटक शैलीतील वीणावादन, पंडित माणिक वर्मा यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे यांचे गायन झाले. आजच्या दिवसाच्या समारोपात ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे वादन हे पहिल्या दिवसाच्या उत्तरार्धातील आकर्षण होते.
दरम्यान, 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 'षड्ज' या शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सवास, तसेच 'अंतरंग' या संवादात्मक कार्यक्रमास बुधवारी सुरूवात झाली. या वेळी 'षड्ज' अंतर्गत दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा ‘पंडित रामनारायण अ ट्रिस्ट विथ सारंगी’ आणि एस. एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’ हे लघुपट दाखविण्यात आले.