पुणे - शिरुर तालुक्यातील टाकळी भिमा गावच्या सरपंचाने एका जमिनीची विक्री ३ जणांना केल्याची घटना घडली आहे. रवींद्र दोरगे, असे या सरपंचाचे नाव आहे.
दोरगे यांच्या नावावर गट नंबर ५४३ मध्ये ६४ गुंठे जमीन होती. त्यांनी ही जमीन ऑक्टोबर २०१५ ला दत्तात्रय पासलकर यांना २० लाख रुपयांना विकली. याची तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीही केली. हा व्यवहार झाल्यानंतर पासलकर यांनी टाकळी भिमा येथील तलाठ्याकडे सातबारामध्ये नाव नोंदवण्यासाठी खरेदी खताची प्रत देवून अर्ज केला. मात्र, त्यांच्या नावाची सातबारामध्ये नोंद झाली नाही. यामुळे त्यांनी याची चौकशी केली असता समजले, की ही जमीन श्वेता सुदिप गुंदेचा (रा. तळेगाव, ढमढेरे, पुणे) यांच्या नावावर आहे. गुंदेच्या नावाची सातबारावर नोंद असल्यामुळे पासलकर यांचे नाव लागणार नाही, असे तलाठ्याने त्यांना सांगितले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर दोरगे यांनी गुंदेच्या आधीही चेतन बळीराम कड (रा. शिक्रापूर, ता. शिरुर, पुणे) यांनाही जमीन विकल्याचे समोर आले.
एकच जमीन तिघांना विक्री केल्याचे उघड झाल्यानंतर पासलकर यांनी दोरगे यांच्याकडे २० लाख रुपये परत देण्याची मागणी केली. मात्र, दोरगे यांनी पैसे माघारी देण्यास नकार दिला. त्यामुळे पासलकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शिवशांत खोसे करत आहेत.